खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवा

तालुक्यातील सरपंच आले एकत्र
Edited by: लवू परब
Published on: January 14, 2025 16:50 PM
views 212  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींकडून नुकसानीचे सत्र सुरूच आहे. हत्तींचा बंदोबस्त करा अशी वारंवार मागणी करूनही वन विभाग दखल घेत नसल्याने तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. तातडीने कर्नाटक येथील खानापूर धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवावी अशी मागणी वनक्षेत्रपाल दोडामार्ग यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले की कर्नाटक येथील खानापूर भागात जी हत्ती पकड मोहीम राबविली आणि यशस्वी पण झाली आहे. ती मोहीम कशी राबविली मग दोडामार्ग तालुक्यात का नाही ? याबाबत १५ दिवसात माहिती द्या, अशी मागणी सरपंच संघटनेने मागणी वनविभागकडे केली आहे. यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांसह तेजस देसाई, संतोश मोर्ये, समीर देसाई, अनिल शेटकऱ, बळीराम शेटये, संजना धुमास्कर आदी उपस्थित होते.


कर्नाटकात राबविली जाते मग सिंधुदुर्गात का नाही ?  : प्रवीण गवस

कर्नाटक राज्यातील खानापूर येथे जी हत्ती पकड मोहीम राबविली गेली आणि यशस्वी पण झाली आहे. आपल्या कडे वनविभागकडून हत्तीपकड मोहीमला निर्बंध घातले आहेत असे सांगून आमची दिशाभूल केली जात आहे. जर ही मोहीम कर्नाटक येथे राबविली जाते तर सिंधुदुर्ग व विशेष करून दोडामार्ग तालुक्यात का राबविली जात नाही याच उत्तर वनविभागने द्याव व येत्या 15 दिवसात या सर्व गोष्टींची माहिती वनवीभागाने आपल्या दोडामार्ग तालुक्यातील सर्व सरपंच व शेतकऱ्यांना द्यावी. व युती सरकारने ही हत्तीपकड मोहीम राबवून आमच्या शेतकऱ्यांना या हत्तीपासून मुक्त करावे एवढीच आमची मागणी आहे, असे सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस बोलताना म्हणाले. यावेळी सोबत केर गावचे उपसरपंच तेजस देसाई, हेवाळे उपसरपंच समीर देसाई, सासोली सरपंच बळीराम शेट्ये, मार्शल फर्नांडिस, विनायक शेटये आदी उपस्थित होते.


आमदार- खासदार यांनी प्रश्न सोडवावा : मदन राणे

दरम्यान, उबाठा शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख बोलताना म्हणाले की हेवाळे, बाबर्डे, केर, मोर्ले आदी गावांत जो हत्ती प्रश्न लोकांना भेडसावत आहे. त्याचा दिवसेंदिवस शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. हत्ती पकड मोहीमसाठी इथले वनविभागाचे अधिकारी इथल्या शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन हत्ती पकड मोहीम राबविता येत नाही. त्याला निर्बंध घातले आहेत. अशा प्रकारची चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. कर्नाटक येथील खानापूर परिसरात जी हत्ती पकड मोहीम राबविली ती कशी राबविली, जरी राज्य वेगळे असेल तरी शेवटी देश एक आहे. त्यामुळे त्या पकड मोहिमेची माहिती घेऊन वनविभागाने आम्हाला द्यावी. व आताच्या सत्ताधारी इथल्या स्थानिक आमदार, खासदार यांनी लक्ष घालून ही हत्ती पकड मोहीम राबवावी अशी आमची मागणी आहे.