दोडामार्ग : खानापूर येथे हत्ती पकड मोहीम राबविल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिलारी खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याबाबत सिंधुदुर्ग वनविभागाने माहिती द्यावी आणि त्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवावी. अशी मागणी केर वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस देसाई यांनी केली आहे.
खानापूर मध्ये जर हत्ती पकड मोहीम झाली असेल तर तिलारी खोऱ्यात का नाही? याबाबत योग्य तो खुलासा न झाल्यास लवकरच वनविभागाविरोधात नाराजी आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आम्हाला सामोरे जावे लागत असून तिथे हत्ती प्रश्न कसा हाताळला यासाठी वनविभाग आणि येथील सरपंच यांचा अभ्यासदौरा आयोजित करावा.सोशल माध्यमावर व्हिडीओ प्रसारित होत आहे. यामुळे तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे मोहीम का नाही असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे वनविभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी असेही देसाई म्हणाले.