सिंधुदुर्गातील साहस प्रतिष्ठानच्या क्रिकेट संघाचं यश

वसई विरार शहर महानगरपालिका - पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन पालघरचं आयोजन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 11, 2025 17:09 PM
views 8  views

सिधुदुर्गनगरी :  वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन पालघर यांच्या सहकार्याने आयोजित केलेली दिव्यांग राज्यस्तरीय प्रदर्शन क्रिकेट सामन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहस प्रतिष्ठानच्या पुढाकाराने बनवलेल्या महाराष्ट्र दिव्यांग महिलाचे दोन संघातील महाराष्ट्र रेड संघ विजेता तर महाराष्ट्र ब्लू संघ उपविजेता ठरला आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शन सामन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पाच जिल्ह्यातील दिव्यांग महिला खेळाडूंचा सहभाग होता. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन पालघर यांच्या सहकार्याने दिव्यांग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार स्नेहा ताई टुबे, पंडित राजन नाईक डॉक्टर हेमंत सावरा, विलास तारे, सत्यप्रकाश तिवारी, बळीराम जाधव, विवेक पंडित, राजेश पाटील, क्षितिज ठाकूर हितेंद्र ठाकूर, आयुक्त अनिल कुमार पवार, आदींसह मान्यवरांच्या, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी राज्यातील सिंधुदुर्ग, मुंबई, सांगली, कोल्हापूर, पुणे व परभणी सह जिल्ह्यांचे महिला खेळाडू सहभागी झाले होते. दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया मार्फत व महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष रमेश सरतापे यांच्या सहकार्याने वसई विरार महानगरपालिका ग्राउंडवर या स्पर्धेचे आयोजन केले होते.

 या राज्यस्तरीय स्पर्धेत साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ इंडियाच्या पश्चिम भारत प्रमुख रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या महाराष्ट्र रेड संघाच्या कर्णधार जयश्री नकाते व मैंनेजर श्रेया पाटील यांनी विजेते संघ म्हणून विजयश्री संपादन केली. तर उपविजेता संघ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच महाराष्ट्र ब्लू संघ कर्णधार स्मिता गावडे व मैंनेजर रसिका शिंदे यांनी उपविजयश्री संपादन केली. सर्व खेळाडूंनीं उत्तम कामगिरी बजावली. यां प्रदर्शनीय सामन्यात चौदा उत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली असून हा महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघ लवकरच सुरत येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे साठी  सहभागी होणार आहे.या यशाबद्दल साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्ष रूपाली पाटील व संस्थेचे विश्वस्त यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले आहे.