सिंधुदुर्गनगरी : बीड जिल्ह्यातील मस्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन १ महीना कालावधी उलटला तरी त्यांच्या मारेकरूंना अद्याप अटक करण्यात आली नसल्याने या घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.
बीड जिल्ह्यातील मस्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली. या घटनेला १ महीना कालावधी झाला तरी त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही. ही राज्याच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपस्थित सरपंचांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. काही मान्यवर सरपंचांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच संतोष देशमुख यांच्या मारेकरी आरोपींना तत्काळ अटक करावी आणि दोषींना कठोर शिक्षा करावी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.
यावेळी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, कसाल सरपंच राजन परब, अनिल शेटकर, अरविंद साटम, कावेरी चव्हाण, श्रिया ठाकूर यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.