चिपळूण : सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयाच्या ३१व्या वार्षिक कला प्रदर्शनास १५ जानेवारी पासून प्रारंभ होणार आहे. या कलाप्रदर्शनाचे उदघाटन बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ रोजी ठीक ११ वाजता संपन्न होणार आहे.याप्रसंगी उद्घाटक म्हणून व अध्यक्ष स्थान हे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर गोविंदरावजी निकम भूषवणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार बबन माने. कोल्हापूर, चित्रकार संतोष पोवार कोल्हापूर, शिल्पकार संदीप ताम्हणकर चिपळूण, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, संस्थेचे सचिव महेश महाडिक हे उपस्थित असतील.
तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी हा गौरव रायगड जिल्ह्यातील कलाशिक्षक सलीम अल्लाभक्ष मनेरी यांना मिळणार आहे.
सलीम अल्लाबक्ष मनेरी हे अंजुमन खैरूळ इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव, जि. रायगड येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील निमसाखर या छोट्याशा गावात गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण एन.ई.एस. हायस्कूल मनेरी येथे पूर्ण झाले. पुढील कलेचे शिक्षण त्यांनी कलाविश्व सांगली या कलामहाविद्यालयात जी. डी. आर्ट व ए.टी.डी करून पूर्ण केले. एम. के. आय. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गोरेगाव येथे दोन वर्ष थोड्या कालावधी करता पार्ट टाइम केल्यानंतर 1993 साली फुल टाईम म्हणून ते कला शिक्षक म्हणून कार्यरत झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ होण्यासाठी शैक्षणिक प्रगती बरोबर समाजामध्ये सर्वधर्मसमभाव या उक्तीप्रमाणे, चांगला नागरिक घडविणे हा उद्देश मनात ठेऊन ते काम करत आहेत. शिक्षक म्हणून सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी कला योगदान देण्याचा आपणास अभिमान आहे. त्यामुळेच आपल्या विशेष कला अध्यापनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचाही आपल्याला आनंद आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो, असे ते म्हणतात. चित्रकलेतील त्यांच्या अमूल्य कल्याण योगदानाबद्दल सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या चित्र शिल्पकला महाविद्यालयाच्या 31व्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून त्यांना शिक्षण महर्षी गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच या कला प्रदर्शनाचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे प्रदर्शनातील कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहण्याचा व विकत घेण्याचा आनंद या कला जत्रेत कलारसिकांना घेता येणार आहे.या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ६०० कलाकृती मांडल्या आहेत. या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.
या कला प्रदर्शनाचा व चित्र शिल्प विक्रीचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केले आहे.