कारागृहांच्या समस्यांबाबत घेतला आढावा

जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि अपर पोलिस अधीक्षकांची संयुक्त पाहणी
Edited by:
Published on: January 08, 2025 19:21 PM
views 51  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, जिल्हाधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती संपुर्णा कारंडे यांनी जिल्हा कारागृहास संयुक्त भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारागृहात बंदिवानांना मिळणाऱ्या जेवणाची, निवासाची तसेच उपहारगृहाची पाहणी केली.  कारागृहातील बंदीवानांची नियमित आरोग्य तपासणी करावी, त्यांना सकस आहार देण्यात यावा अशा सूचना कारागृह प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी बंदिवानांशी संवाद देखील साधला.  


या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली.  या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री एकशिंगे यांनी कारागृहाबद्दल सविस्तर माहिती दिली. कारागृह परिसरात भाजीपाल्याची सेंद्रीय  शेती करण्यात येते.  बंदिवानांच्या आहारात देखील याच भाजीपाल्याचा समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. बंदिवानांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी कारागृहात आरोग्य अधिकारी आणि परिचारीका कायमस्वरुपी उपलब्ध करुन द्यावी.  कारागृहास मंजूर झालेला शस्त्रसाठा ठेवण्याकरिता व कारागृह कर्मचारी यांच्याकरिता सुरक्षा रक्षक खोली, शस्त्रसाठा जतन करण्याकरिता शस्त्रगार व बंद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय, कारागृह ते गरुड सर्कल ओरोस या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, कारागृहाच्या तटबंदीच्या आतील व बोहरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशीही मागणी श्री लटपटे यांनी समीती समोर केली.