सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांची भेट घेत जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणारे प्रश्न व समस्या लेखी निवेदनाद्वारे मांडल्या व लवकरात लवकर जिल्ह्यातील वीज समस्या सोडविण्याची आग्रही मागणी केली. महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. साळुंखे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यात जिल्ह्यातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे आवश्यक असून जिल्ह्यात ३१ सबस्टेशन असून आणखी ११ नवीन सबस्टेशन उभारणे आणि आवश्यक त्या वेगवेगळ्या ठिकाणी अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर जोडणीसाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी केली असून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयांकडे सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री. साळुंखे यांनी अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग म्हणून कारभार हाती घेतल्यावर २६ जुलै रोजी संघटना व व्यापारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वागत करून जिल्ह्यातील समस्या लेखी स्वरूपात मांडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संघटनेकडे थोडा वेळ मागून जिल्ह्यातील बहुतांश समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी त्यांनी किती समस्या मार्गी लावल्या याचा सविस्तर मागोवा घेत उर्वरित समस्या सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे सांगून जर कोणाच्या समस्या सुटत नसतील, कर्मचारी, अधिकारी योग्य उत्तर देत नसतील तर वैयक्तिक संपर्क साधून माहिती द्यावी, आपण स्वतः त्यात लक्ष घालून समस्येचे निराकरण करू असेही आश्वासन श्री साळुंखे यांनी दिले. संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून आंब्रड सबस्टेशन मार्गी लागले असून लवकरच तळवडे येथील समस्या देखील जातिनिशी लक्ष घालून सोडविण्याची त्यांनी ग्वाही दिली. दोडामार्ग येथील तेरवन मेढे आदी भागातील समस्या, बांदा विभागातील आरोस, सह्याद्री पट्ट्यातील दाभिल, कोनशी,असनिये, भालावल आदी गावांच्या समस्या, वीज वाहिन्या जंगलमय भागातून शिफ्टींग करणे, आंबोली, चौकुळ, गेळे येथे उच्चदाब रोहित्र बसविणे, तळवडे मिरिस्तेवाडी येथील विद्युत रोहित्राची क्षमता वाढविणे, आदी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला.येत्या काही दिवसात जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याची महावितरणची योजना असून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला असून वीज ग्राहकांनी देखील स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याबाबत आपापल्या भागातील वीज कार्यालयांकडे सविस्तर अर्ज द्यावा अशा वीज ग्राहकांना सूचना केल्या आहेत. महावितरण येत्या काही दिवसात प्रत्येक घरात प्रथम पोष्टपेड पद्धतीने स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणार असून त्यानंतर त्याचे रूपांतर प्रीपेड मीटर मध्ये करणार आहे. हे स्मार्ट प्रीपेड मीटर महावितरण स्वतः बसविणार नसून प्रायव्हेट कंपनीकडून ते काम करून घेणार आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून असे प्रकार करू नयेत अशी मागणी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली.
जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात १०० किमी एरिया मध्ये भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या असून उर्वरित शहरे, गावांमध्ये देखील भूमिगत वीज वाहिन्या प्रस्तावित असल्याची माहिती अधीक्षक अभियंता यांनी दिली. टप्प्याटप्प्याने अत्यावश्यक असलेली कुडाळ वेंगुर्ला ही मुख्य लाईन भूमिगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच घरोघरी संवाद साधून वीज समस्या जाणून घेऊन प्रत्येकाचा मोबाईल क्रमांक वीज मीटरला जोडण्याचे काम सुरू असून मार्च महिन्यापर्यंत ते पूर्ण केले जाईल व अत्यावश्यक असलेली झाडे तोडणे वगैरे कामे पावसाळ्याच्या पूर्वीच केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुका सचिव अस्लम खतीब, सहसचिव समीर शिंदे, तुकाराम म्हापसेकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, तळवडे येथील नारायण तथा बाळा जाधव यांनी विविध भागातील वीज समस्या सविस्तरपणे मांडल्या. यावेळी वेंगुर्ला तालुका सचिव जयराम वायंगणकर, वाल्मिक कुबल आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीत संघटनेचे पदाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांच्यात सकारात्मक चर्चा असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व जिल्ह्यातील उर्वरित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली.