
सावंतवाडी : चौकुळ येथील मळववाडी, बेरडकी चुरणीची मुस व बेरडकी जांभरे या दोन वाड्यांना जोडणार्या रस्त्याचे काम येत्या चार दिवसात सुरू करण्यात यावे. अन्यथा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांना घेवून ठिय्या आंदोलन करू असा इशारा चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांनी जिल्हा व बांधकाम प्रशासनाला दिला आहे.
ही कामे गेली पाच वर्षे अर्धवट स्थितीत आहेत. काही ठीकाणी चुकीच्या पध्दतीने रस्ते आणि मोर्या खोदून ठेवण्यात आल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. हा सर्व प्रकार ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सुरू असून ग्रामस्थांच्या भूमिकेबाबत प्राधान्याने लक्ष द्यावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
वारंवार निवेदन देवून सुध्दा संबंधित ठेकेदार आणि प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. याबाबत चार दिवसात योग्य ती भूमिका घ्यावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा श्री गावडे यांनी दिलाय