
कुडाळ : समाजाने समाजासाठी तसेच इतरांसाठी सुद्धा काम केले पाहिजे. जेणेकरून त्याचा फायदा सर्वांना होईल अनेक सामाजिक विषय आहेत. त्या विषयांवर अभ्यास करून त्याची जनजागृती करणे आज महत्त्वाचे आहे. तशा प्रकारे आपण काम केले तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल असे आवाहन प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांनी गौड ब्राह्मण सभा वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना केले. यावेळी त्यांनी आपण काम करीत असलेल्या पर्यावरण दक्षता मंडळाच्या कामाची माहिती दिली.
गौड ब्राह्मण सभेचे 127 वे वार्षिक स्नेहसंमेलन 25 डिसेंबर रोजी दादर मुंबई येथील शारदाश्रम विद्यामंदिरच्या या दत्त मंदिर सभागृहात श्री वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक या विषयांवर उहापोह करून समाज बांधवांनी काम कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर गौड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्राध्यापक जगदीश वालावलकर, कार्याध्यक्ष रमेश झरापकर, खजिनदार योगेश खानोलकर, कार्यवाह महेश राळकर आदी मान्यवर उपस्थित होते. गौड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्राध्यापक वालावलकर यांनी सुरुवातीस संस्थेच्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी समाज बांधवांसाठी सतत कार्यरत असलेल्यागौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई या संस्थेची स्वतःची मुंबईत इमारत बांधण्याचा संकल्प जाहीर केला. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी गौरव ब्राह्मण सभेचे अधिकारी व चाहते प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. संस्था समाजासाठी कोण कोणते उपक्रम राबवित आहे याची सुद्धा सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
गौड ब्राह्मण सभेच्या या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून गौड ब्राह्मण न्यातीतील महनीय व्यक्तीनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. संस्थेने यावर्षी अध्यक्ष कै . रा . ब अनंत शिवाजी देसाई टोपीवाला ट्रस्टचे विकास मोतीराम देसाई टोपीवाले यांना जीवन गौरव पुरस्कार तर पत्रकारितेतील योगदानाबाबत स्व . रावबहादुर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कुडाळ ( परुळे ) येथिल ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत याना प्रदान करून सन्मानित केले. तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरेगाव येथिल प्रमोद देसाई यांना स्व . बा . नी . देसाई आदर्श समाजसेवक पुरस्कार ' सामाजिक कार्यकर्ते डोंबिवली येथील भिकाजी वालावलकर यांना स्व . पी डी . नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार ' श्रद्धा देसाई, अध्यक्ष कुडाळदेशकर गौड ब्राम्हण महिला मंडळ ठाणे याना ' तर विशेष कर्तृत्व पुरस्कार गीतकार समीर सामंत व कुडाळ येथील दीक्षा नाईक नृत्य क्षेत्रात प्राविण्य यांचाही मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र - स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरवातीस ज्ञातीतील नाट्य कलाकार संतोष सामंत व दीपक परुळेकर यांनी दुरीतांचे तिमीर जावो हे नाटक सादर केले. तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन वालावलकर यांनी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.