पाणी पिताना ठसका लागला, जीवाला मुकला

Edited by: मनोज पवार
Published on: December 28, 2024 18:29 PM
views 378  views

दापोली : पाणी पीत असताना ठसका लागून एका ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद येथे घडली असून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

याबाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दत्ताराम गणू कांगणे हे त्यांच्या ४ सहकारी यांचेसह  काल (ता.२७) रोजी सकाळी ९.३० वाजता  आसूद येथे एका जागेच्या साफसफाईच्या कामाला गेले होते. सकाळी   १०.३०  वाजणेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी काम थांबवले होते. कांगणे यांच्यासोबत कामाला गेलेले संजय विठ्ठल दुबळे, रा. गिम्हवणे हे पाणी पित असताना त्यांना अचानक ठसका लागला. त्यानंतर त्यांना २ ते ३ वेळा उचकी लागली व थोड्या वेळाने त्यांनी तेथेच मान टाकली. त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दत्ताराम कांगणे यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.