कुडाळात भाजी विक्री करणाऱ्या तरुणाची आत्महत्या ?

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 27, 2024 11:58 AM
views 353  views

कुडाळ : कुडाळ शहरांमध्ये भाजी विक्री करून आपली उपजीविका चालवणारा मूळचा विजापूर मधील २८ वर्षीय शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र या आत्महत्या मागे संशय निर्माण केला जात असून या आत्महत्येचे कारण अद्याप उलगडलेले नाही.

कुडाळ शहरांमध्ये गेली अनेक वर्ष शिवा नायक हा भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करत आहे. हा मुळचा कर्नाटक राज्यातील विजापूर येथील असून तो सध्या शहरातील मारुती मंदिर शेजारी असलेल्या राजेश पडते यांच्या चाळीत भाड्याने राहत होता. काल बुधवारी कुडाळ शहराचा आठवडी बाजार होता आणि या बाजारामध्ये भाजी विकताना अनेकांनी त्याला पाहिले. मारुती मंदिर नजीक तो भाजी विक्री करायचा दरम्यान याबाबत डॉ. आंबेडकर नगर येथे राहणारी त्याची बहीण सीता शंकर राठोड हिने कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली की, आपला भाऊ शिवा कृष्णा नायक याने राहत असलेल्या चाळीतील खोलीमधील किचन रूम मध्ये छपराच्या वरील लोखंडी बारला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या त्याने पहाटेच्या वेळी केली असावी असा अंदाज असून त्यावेळी त्या खोलीमध्ये पत्नी व मुले रात्री झोपल्यानंतर ही आत्महत्या त्याने केली असे खबर मध्ये म्हटले आहे. दरम्यान कुडाळ शहरांमध्ये या आत्महत्येबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून ही आत्महत्या आहे की, घातपात आहे याची चर्चा सुरू झाली आहे. कुडाळ पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात याकडे कुडाळवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.