ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय कुडाळात स्थलांतरित करा

प्रसाद गावडेंनी वेधलं लक्ष
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 27, 2024 11:55 AM
views 44  views

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त झालेल्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी वं गटविकास अधिकाऱ्यांकडे करत नागरिकांना होणाऱ्या गैरसोईकडे लक्ष वेधले आहे. 

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अखत्यारीतील व पंचायत समिती कुडाळ अधिनस्त ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुडाळ कार्यालय हे मागील अनेक दिवसांपासून ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे मुक्कामी आहे. सदरचे कार्यालय पंचायत समिती कुडाळ कार्यालयाच्या परिसरात कार्यरत असणे लोकाभिमुख कामकाजाच्या दृष्टीने योग्य व तालुक्यातील नागरिकांना दिलासा देणारे ठरणारे होते मात्र सदर कार्यालय जागे अभावी ओरोस, सिंधुदुर्गनगरी मुक्कामी कार्यरत असल्याने नागरिकांसाठी प्रचंड क्लेशदायक व गैरसोयीचे ठरत आहे. याबाबत अनेकवेळा कुडाळ तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाचे लक्ष देखील वेधण्यात आले.

मात्र “ जागेची उपलब्धता नाही ”  हे कारण देवून अधिकारी वर्गाकडून त्याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक करण्यात आलेली  आहे. आजमितीस कुडाळ पंचायत समिती कार्यालय आवारातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय आवारात नव्या जागेत स्थलांतरीत झाले असून सदरची जागा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कुडाळ कार्यालयासाठी उपलब्ध होवू शकते असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय व लोकाभिमुख जलद प्रशासकीय कारभाराची आवश्यकता लक्षात घेवून ओरोस,सिंधुदुर्गनगरी मुक्कामी उपविभाग कुडाळ कार्यालय आपल्या कुडाळ पंचायत समिती आवारातील रिक्त जागेत स्थलांतरीत करण्यात यावे अशी आग्रही मागणी गावडेंनी केली आहे.