देवस्थान समिती उप कार्यालयासमोर नेरूर ग्रामस्थांचं उपोषण

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 14:41 PM
views 106  views

सावंतवाडी : कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती देऊळवाडा नेरुर यांच्या कारभाराला पाठीशी घालण्याच काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर करत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ नेरूर ग्रामस्थांनी लाक्षणीक उपोषण छेडले आहे. सावंतवाडी माठेवाडा येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उप कार्यालयासमोर हे उपोषण सुरु आहे. हुकुमशाही, दडपशाहीसह बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब करुन आर्थिक मनमानी करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातं असल्याचा आरोप श्री देव कलेश्वराचे चाकर, नोकर व नेरुर मतदार ग्रामस्थांनी केला आहे.

सावंतवाडी माठेवाडा येथील देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांच्या उप कार्यालयासमोर हे लाक्षणीक उपोषण सुरू आहे. यावेळी यापूर्वीची नेरूर कलेश्वर देवस्थान समिती निवडीची सभा आरोप प्रत्यारोपांमुळे बंद पडली. सभेचा शेवटी सरपंचांनी जुन्या समितीवर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत नवीन समिती न नेमण्याचे आदेश दिले होते. ग्रामसभेत तसा ठराव घेतला असताना जिल्हाधिकारी कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांनी शासकीय अधिकाराचा वापर करुन आजची देवस्थान समिती निवडीची सभा लादली आहे असा आरोप करत त्याविरोधात आपण उपोषण छेडल्याचे उपोषणकर्ते सुहास नेरूरकर यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर प्रतिनिधींकडून उपोषण कर्त्यांशी चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून आयोजित आजच्या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केलं.

मात्र, उपोषणकर्त्यांनी आपल्या भुमिकेवर ठाम राहत लाक्षणिक उपोषण सुरूच ठेवले. यावेळी सुहास नेरूरकर, आनंद नेरूरकर, प्रसाद पोईपकर, संजय मेस्त्री, सुरेंद्र घाडी, मनोज चव्हाण, अमित नाईक, जयवंत मेस्त्री, अनिकेत मेस्त्री, भरत नेवगी, निलेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, विवेकानंद नेरूरकर, प्रथमेश नेरूरकर, आशिष नेरूरकर आदी उपस्थित होते.