सावंतवाडी न.प.चा प्लास्टिक विरोधात कारवाईचा धडाका

Edited by: विनायक गांवस
Published on: December 26, 2024 12:37 PM
views 126  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेने एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई करुन मुद्देमाल जप्त केला. सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पालिका प्रशासनातर्फे आठवडा बाजार, बस स्थानक व गांधी चौक परिसरात आस्थापना व विक्रेत्यांची तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.

सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी पालिका प्रशासनाच्या पथकाने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता धनंजय देसाई, प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे, वसुली लिपिक दिनेश भोसले, अक्षय पंडित, रिजवान शेख व अन्य कर्मचारी यांनी सावंतवाडी शहरातील विविध ठिकाणी आस्थापना व विक्रेते यांची तपासणी केली. याआधी दोन आठवड्यापूर्वी 10 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या कारवाईत 200 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त करून रू.9 हजार रू.इतका दंड आकारण्यात आला होता.

शासनाच्या एकल वापर प्लास्टिक बंदीला शहरातील नागरिक व विक्रेते यांचेकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सावंतवाडी शहरातील प्लास्टिकचा वापर जवळपास नगण्य असल्याचे दिसून येत आहे.या कारवाईदरम्यान दोन किलो प्लास्टिक पालिका प्रशासनाच्या पथकाद्वारे जप्त करण्यात आले आहे. शहरातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी एकल वापर कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरणाच्या रक्षणाकरिता आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी यांनी केले आहे.