दापोली : कल्याण येथे परप्रांतीयांकडून स्थानिकांना झालेल्या मारहाणीचे पडसाद संपूर्ण राज्यात पसरले असतानाचा दापोली शहरातील बुरोंडी नाका येथील रिक्षा थांब्यावर मद्यधुंद असलेल्या एका परप्रांतीयाने स्थानिकाला मारण्यासाठी सुरी उगारल्याची घटना काल सायंकाळी ५ वाजता घडली असून यामुळे दापोली शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिम्हवणे येथिल प्रभाकर झगडे हे काल (ता.२०) रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांच्याकडे काम करणार्या व्यक्तीला भेटायला बुरोंडी नाका येथील रिक्षा थांब्यावर गेले होते. तेथेच विपुल तेली हेही त्यांची दुचाकी घेवून आले होते. काही दिवसांपूर्वी प्रवीण झगडे व विपुल तेली यांच्यात वाद झाला होता, प्रभाकर झगडे हे प्रवीण झगडे याचेबरोबर बोलत असताना विपुल तेली हे तेथे आले व त्यांनी प्रवीण झगडे याला शिवीगाळ केली व प्रभाकर झगडे यानाही शिवीगाळ केली. विमल तेली हे मद्यप्राशन केल्याचे प्रभाकर झगडे यांच्या लक्षात आले. काही वेळाने विमल तेली यांनी त्यांच्या दुचाकीच्या डीक्कीमधून एक सुरी काढली व ती घेवून ते प्रभाकर झगडे यांना मारण्यासाठी गेले असता झगडे यांच्या लक्षात आले. व ते थोड्या अंतरावर जावून थांबले. तेथेच उभे असलेल्या दापोलीतील नागरिकांनी विमल तेली यांना अडवले व दापोली पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांना सर्व घटनेची झगडे यांनी माहिती दिले तसेच तेली यांच्या दुचाकीच्या डिक्कीत मद्याची बाटली, ग्लास व सुरी असल्याचेहि सांगितले. त्यानंतर तेली यांना त्यांच्या दुचाकीसह दापोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
प्रभाकर झगडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विमल तेली याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल राजेंद्र नलवडे करत आहेत. विमल तेली यांना नोटीस देवून सोडून देण्यात आले. विमल तेली हे आईसक्रीम विक्रीचा व्यवसाय करत असून परप्रांतीयाकडून स्थानिकांना झालेल्या शिवीगाळ व सुरी घेवून अंगावर धावून जाण्याच्या प्रयन्त्नामुळे दापोली शहरात हाच विषय चर्चेचा बनला आहे.