उंबर्डेत वायरमनला मारहाण ; एका विरोधात गुन्हा दाखल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 19, 2024 19:09 PM
views 187  views

 वैभववाडी : विजवाहीन्यावरील झाडांच्या फांद्या तोडल्याच्या रागातुन उंबर्डे मेहबुबनगर येथे वायरमन हसन हमीद पाटणकर यांना मारहाण झाली. याप्रकरणी येथील अब्दुल रहिमान दस्तगीर रमदूल याच्याविरोधात पोलीसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

श्री. पाटणकर हे उंबर्डे येथे वीज वितरण कंपनीत वायरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ५ डिसेंबरला गावातील अस्लम रमदुल आणि समीर लांजेकर यांनी फोन करून उंबर्डे मेहबुबनगरमधील २० घरांचा विज पुरवठा खंडित असल्याचे सांगीतले. त्यानंतर श्री.पाटणकर आणि तन्वीर बोबडे हे दोघे मेहबुबनगरमध्ये गेले.त्यांनी विजवाहीन्यांची पाहणी केली असता त्यांना एका ठिकाणी विजवाहीन्यांवर झाडांची फांदी पडलेली दिसुन आली. त्यामुळे त्यांनी ती फांदी तोडली. याशिवाय इतर ठिकाणच्या फांद्या देखील त्यांनी तोडुन विजप्रवाह सुरू केला. यापैकी काही झाडे ही अब्दुल रमदुल यांची होती. त्यामुळे त्यांच्या मनात राग होता.

दरम्यान आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास श्री.पाटणकर हे तेथील ट्रान्सफार्मरवर काम करीत असताना त्यांना  श्री.रमदुल यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. यासंदर्भात तक्रार दिल्यानतंर पोलीसांनी त्यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजन पाटील हे करीत आहेत.