
कुडाळ : नारूर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी ते उपचार या योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा 18 बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला.
नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून याचाच एक भाग म्हणून गावातील बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी बुधवार दि. 4 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित कण्यात आले होते.
सुरुवातीला हे शिबिर ग्रामपंचायत नारुर येथे होणार होते. मात्र, मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे हे शिबिर काटकरवाडी येथील ग्रामस्थ रवींद्र देसाई यांच्या घरी आयोजित करण्यात आले. या शिबिराचे सकाळी 9 वा. उद्घाटन झाले. त्यानंतर बांधकाम कामगारांची आणि त्यांच्या कुुटुंबियांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकार्यांनी केली. या शिबिरात डॉ. संजय चव्हाण, विशाखा गावडे, रिया पाटील, स्नेहल परब, स्वाती वालावलकर, वैभव परब हे सहभागी झाले होते. तर शिबिर यशस्वी करण्यासाठी किशोर सरनोबत, प्रसाद सरनोबत, एकनाथ सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य सानिका सरनोबत, सावित्री सरनोबत, बाळा आचरेकर, रवींद्र देसाई आणि नारुर ग्रामपंचायतीचे कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले. या शिबिरात एकूण 18 बांधकाम कामगार कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली.