
मंडणगड : परभणी शहरातील भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, अर्थतज्ञ, बुद्धीसम्राट, ज्ञानाचे प्रतिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा असणाऱ्या परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीचे मंगळवार १० डिसेंबरला तोडफोड करून विटंबना करण्यात आली. विटंबना करणाऱ्या गुन्हेगारास पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतल्याचे समजते. अशा कृतीचा व वृत्तीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
या समाजद्रोही, राष्ट्रद्रोही कृती करणाऱ्या गुन्हेगारास व त्यामागील सूत्रधारांस फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मंडणगड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ (आठवले) मंडणगड यांच्याकडून देण्यात आले. तसेच निवेदनावर पक्षाचे दादासाहेब मर्चंडे (राज्य कार्यकारिणी सदस्य), आदेशभाऊ मर्चंडे (जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक), आयु. नागसेन तांबे (तालुकाध्यक्ष), रामदास खैरे (तालुका सचिव), किरण पवार (जिल्हा सदस्य), सुरेश तांबे (सल्लागार) संकेश कासारे (युवक सरचिटणीस), गौरव मर्चंडे (युवक कोषाध्यक्ष) , शंकर पवार (सल्लागार), आकाश पवार (युवक कार्यकर्ते), अतुल कासारे ,अरविंद कासारे, प्रेम साळवी, प्रमोद जाधव, रवींद्र जाधव आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.