
सावंतवाडी : माडखोल येथे विद्युत पोलवर चढून काम करणाऱ्या रुपेश अनंत डांगी या तरूणाचा मृत्यू झाला. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्याच्या जीवावर बेतले. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ठेकदार गौरेश सावंत याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. मात्र, अचानक सुरू झालेला वीज प्रवाह नेमका कोणी सुरु केला ? वीज वितरण कंपनीचे कोण कर्मचारी यावेळी उपस्थित होते ? जबाबदारांना सहआरोपी का केले नाही ? अशी चर्चा सुरु आहे. चोर मोकाट असून संन्याशाला फाशी सारखा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून सखोल चौकशी सुरू आहे. हकनाक जीव गमवावा लागलेल्या रूपेश डांगेच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होतेय. तर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणखीन किती जणांचे बळी घेतले जाणार ? हा सवाल देखील उपस्थित होतोय.
याआधीही महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेकांनी जीव गमावले. शेतकऱ्यांचे पाळीव प्राणीही यातून सुटले नाहीत. एवढंच नव्हे तर आता महावितरणचे कर्मचारीही सुरक्षित नाहीत. एवढ असूनही परिस्थिती जैसे थेच आहे. 'कंत्राटी'च्या नावाखाली महावितरण अन् शासन काढता पाय घेत आहेत. घडणाऱ्या दुर्देवी घटनांच सोयर-सुतक त्यांना पडलेलं नाही. असाच प्रकार माडखोल येथे घडला. विद्युत पोलवर चढून काम करणाऱ्या रुपेश अनंत डांगी या तरूणाचा मृत्यू झाला. अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने त्याच्या जीवावर बेतले. हॉस्पिटलमध्ये पोलिसांना जबाब देणारा रूपेश काही तासांत जग सोडून जाईल असं कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. अचानक सुरू झालेला वीज प्रवाह नेमका कोणी सुरु केला? वीज वितरण कंपनीचे कोण कर्मचारी यावेळी उपस्थित होते ?याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हात झटकले तरी पोलिसांनी काम सुरू असताना वीज सुरू आणि बंद कोणी केली ? ते शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कंत्रीटी कामगार रुपेश डांगी या युवकाच्या मृत्यूस विज वितरण कंपनीही तेवढीच जबाबदार असून त्यांना आत्तापर्यंत पोलिसांनी सहआरोपी का केले नाही ? अशी चर्चा सुरु आहे.
विज प्रवाह बंद करुन मगच तांत्रिक बिघाड दुर करण्यासाठी कामगाराला वर चढवले होते असा जबाब ठेकेदार गौरेश सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे हा प्रवाह कोणीतरी सुरु केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून यात वीज कंपनीकडूनही काही प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली आहे.माडखोल खळणेवाडी येथे वीज खांबावर फुटलेला इन्सुलेटर बदलण्यासाठी ठेकदार गौरेश सावंत यांचा कामगार रुपेश डांगी हा खांबावर चढला होता.त्यांनतर तो काम करत असताना अचानक विजेचा जोराचा झटका लागला त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ठेकदार गौरेश सावंत याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानतर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्याची तब्येत बरी नसल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला असून ठेकदाराने दिलेल्या जबाबानुसार वीज खांबावर चढण्यापूर्वी वीज प्रवाह स्वीच बंद केला होता. त्यांनतर तो कोणीतरी चालू केला अशी माहिती दिली. त्यात शॉक लागून कामगार मयत झाला आहे असे समोर येत आहे. तर पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब देखील स्पष्ट झाली असून याबाबत वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानी देखील काम सुरू असताना वीज प्रवाह सुरु होता अशी कबुली दिली आहे. मात्र तो कोणी सुरु केला हे आम्हाला माहिती नसून पोलिसांनी याप्रकरणी त्या अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी सहा. पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी वीज अधिकारी कर्मचारी यांची मागणी फेटाळून लावली. असा अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करता येणार नाही. विज प्रवाह सुरु करणे, बंद करणे हे काम वीज कंपनीच्या अधिकृत कर्मचारी यांच्याकडूनच केले जात असून त्याच्या निगराणी खालीच ही कामे होतात असे तपासात देखील निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वेळ पडल्यास या गुन्ह्यात ठेकदार यांच्यासह विज कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही गुन्ह्यात सह आरोपी केले जाईल. त्या दिशेने तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, हकनाक बळी पडलेल्या रूपेश डांगी यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पुढे येत आहे. वारंवार महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. आता त्यांचे कर्मचारीही सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. शासनाकडून ठोस उपाययोजना यावर करण्यात यावी. अन्यथा, बळी मोजण्यापलिकडे दुसरं काही हाती शिल्लक रहाणार नाही.