
सावंतवाडी : भगवद्गीता हा ग्रंथच मुळात मानवी जीवनाचे सार सांगून जातो. थोडक्यात सांगायचे तर भगवद्गीतेचा प्रत्येक अध्याय नवीन काहीतरी शिकवतो. आपण भगवत गीता अध्यात्मिक गोष्टी तर शिकवतेच पण आपण आज थोडं व्यावहारिक दृष्टीने भगवद्गीतेकडे पाहायला हवे. अर्जुन जेव्हा आपल्या स्वकीयांनाच आपल्या विरुद्ध पाहत होता, तेव्हा तो भावनिक झाला आणि युद्धास नकार देऊ लागला. यावेळी भगवंताने त्याला सांगितले की, तुझे स्वकीय म्हणजे लौकिकातील नाते आहे. पण आता तू युद्धभूमीवर आहेस इथे फक्त तुझा शत्रू आहे आणि धर्मानुसार तू युद्ध करायलाच हवेस. कारण तुझा धर्मच क्षत्रीय. आता या गोष्टीतून आपण व्यावहारिकता शिकूच शकतो. तुमची जी काही भावनिक गुंतवणूक आहे तिचा तुमच्या धर्मावर म्हणजे जे काही काम तुम्ही करत असाल उदाहरणार्थ विद्यार्थी, नोकरी, वगैरे वगैरे वर परिणाम होऊ नये, असे प्रतिपादन आजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष अण्णा झांट्ये यांनी व्यक्त केले.
गीता जयंतीनिमित्त आजगाव मराठी शाळा माजी विद्यार्थी संघ आणि मराठी ग्रंथालय आजगाव यांच्या माध्यमातून मराठी ग्रंथालय आजगावच्या सभागृहात गीताई पठण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी श्री.अण्णा झांट्ये बोलत होते. 11 डिसेंबर 2024 रोजी सदर स्पर्धा इयत्ता तिसरी ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत तिसरी ते पाचवीच्या गटात एकूण बारा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर सहावी ते आठवीच्या गटामधून एकूण नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण शिरोडा येथील माजी ग्रंथपाल अनंत नाबर आणि अरविंद प्रभू सर यांनी केले.यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, उपाध्यक्ष सूर्यकांत आडारकर, सचिव विलासानंद मठकर, उमर्ये गुरुजी, ग्रंथपाल आजगावकर मॅडम आणि केंद्रमुख्याध्यापिका ममता मोहन जाधव तसेच केंद्रातील शिक्षक, पालक आदि उपस्थित होते.स्पर्धेतील विजेत्या पहिल्या पाच स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र तर इतर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र देऊन अध्यक्ष श्री. झांट्ये यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी परीक्षक अरविंद प्रभू यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीटे आणि पेन देण्यात आले. स्पर्धेत गट क्र. 1 ली इ. 3 ते 5 वी कुमारी गायत्री पुरुषोत्तम शेणई - शाळा नाणोस जोशी- प्रथम क्रमांक, कुमारी आराध्या संदेश नाईक - केंद्रशाळा आडगाव नं.1 - द्वितीय क्रमांक, कुमार कैवल्य प्रमोद पांढरे - केंद्रशाळा आजगाव नं. 1 - तृतीय क्रमांक, कुमारी विभा सागर कानजी - केंद्र शाळा आजगाव नं. 1 - उत्तेजनार्थ,कुमार आराध्य आनंद खोत शाळा आजगाव भोमवाडी - उत्तेजनार्थ व मोठा गट इ. 6 ते 8 वी कुमारी कनक दिनानाथ काळोजी - केंद्रशाळा आजगाव नं. 1 - प्रथम क्रमांक,कुमारी जान्हवी सचिन मुळीक -केंद्रशाळा आजगाव नं. 1- द्वितीय क्रमांक,कुमारी नमिता वामन शेणई विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव - तृतीय क्रमांक,कुमारी सोनल सुनील मुळीक - शाळा धाकोरे नं. 1 - उत्तेजनार्थ,कु. ईश्वरी नरेंद्र भोसले केंद्रशाळा आजगाव नंबर 1 - उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.