गोवा बनावटीची दारु वाहतूक प्रकरणी सशर्त जामीन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 17:50 PM
views 239  views

सावंतवाडी : झाराप येथे गोवा-मुंबई महामार्गावर एकसष्ठ लाख अठ्ठावीस हजारांचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला होता. दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वकिलांचा युक्तीवाद ग्राहय मानून  पंचवीस हजारांच्या सशर्त जामीनावर आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे. 

४ डिसें.२०२४ रोजी आरोपी ओम प्रकाश गुप्ता, वय-३२ वर्षे, रा. घनसोली गाव नवी मुबंई व शिव लखन केवट वय-३० वर्षे रा. गोंदर गढी रीवा मध्यप्रदेश यांची झाराप, गोवा-मुंबई महामार्गावर गाडी थाबंवली आणि विचारपूस केली असता गाडीत रिकामे डबे असल्याचे सांगून त्यांनी त्याबाबत बिल्टी, टॅक्य इन्वाइस व ई-वे बिल दाखविले. त्यांनी सादर केलेली कागदपत्रे यांचा पोलीसांना संशय आल्याने  वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता वाहनामध्ये असलेले ड्रमच्या खालील पुठ्ठ्याचे बॉक्स उघडवून पाहिले असता त्यामध्ये गोवा बनावटी मद्याच्या एकूण ९४० बॉक्समध्ये रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की या ब्रन्डच्या १८० मि.ली. मापाच्या ४५,१२० प्लॉस्टिक सिलबंद बाटल्या, व ८० बॉक्समध्ये मिळून एव्हरग्रीन रिझर्व्ह व्हिस्की या बॅन्डच्या ७५० मि.ली. मापाच्या ९६० सीलबंद काचेच्या बाटल्या असे एकूण १०२० पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटी मदयाच्या रु.५० लाख ८८ हजार ००० किंमतीचा मदयसाठा तसेच वाहतूक कामी वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण रक्कम एकसष्ठ लाख अठ्ठावीस हजारांचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला. दारु वाहतूक कामी वापरण्यात आलेले वाहन व वाहनचालक त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई),८०,८१,८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

आरोपी ओम प्रकाश गुप्ता, शिव लखन केवट यांना अटक करुन कुडाळ येथील न्यायालयात हजर करुन ३ दिवसाची पोलिस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने आरोपी तर्फे अॅड परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानून पोलीस कोठडी नाकारुन न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आलेली होती. जामीन अर्ज दाखल करुन त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून त्यांची रुपये पंचवीस हजार मात्र च्या सशर्त जामीनावर आरोपीची मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे अॅङ परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.