
मालवण : चिवला बिच येथे होणारी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. मात्र, या स्पर्धे मध्ये येथील स्थानिकांना स्पर्धा फी मध्ये सुट मिळावी अशी मागणी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी मालवण तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, बाबी जोगी, महेश जावकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर,नरेश हुले, अमन बेग, निखिल शिंदे, नंदा सारंग, शांती तोंवळकर, अश्विनी आचरेकर, मानसी घाडीगावकर, तन्वी भगत आदी उपस्थित होते.
खोत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण चिवला बीच येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) संदर्भात आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. चिवला बीच येथील समुद्र किनाऱ्यावर मुंबईची एक संस्था दरवर्षी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करते. ह्या स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धकाला रु. २०००/- (दोन हजार रुपये) अशी मोठी रक्कम "फी" म्हणून आकारली जाते. मात्र स्थानिक मुलांना फी मध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासीयांप्रमाणे तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे, केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना १००% फी मध्ये सूट देण्याची अट सदर संस्थेला परवानगी देतानाच घालण्यात यावी. तसेच गावातील भूमिपुत्रांसाठी हे "कायमस्वरुपी धोरण" ठेवावे व त्यांना फी मध्ये पूर्णतः माफी द्यावी. ह्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख प्रवेश अर्जामध्येच केलेला असावा अशी मागणी शिल्पा खोत यांनी केली आहे.