ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ला शहर समन्वयक विवेक आरोलकर यांचे निधन

Edited by: दिपेश परब
Published on: December 03, 2024 19:45 PM
views 251  views

वेंगुर्ला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले शहर समन्वयक विवेक आरोलकर (४८) यांचे मंगळवारी (३ डिसेंबर) दुपारी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. विवेक आरोलकर गेले काही महिने आजारी होते. 

    गेली अनेक वर्ष ते शिवसेनेचे सक्रिय व विश्वासू कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ते उद्धव ठाकरे शिवसेने सोबत राहिले होते. कडवा व आक्रमक शिवसैनिक म्हणून वेंगुर्ल्यात त्यांची ओळख होती. ठाकरे शिवसेनेतर्फे वेंगुर्ल्यात साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तसेच वेंगुर्ले शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग होता. आजारी असतानाही नुकत्याच झालेल्या सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रियपणे काम केले होते. वें

गुर्ल्यात मानसी आर्ट सर्कल या संस्थेची स्थापना करून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. मानसी आर्ट सर्कल तर्फे दरवर्षी खुली गीत गायन स्पर्धा घेतली जायची. या स्पर्धेमुळे विवेक आरोलकर यांची वेंगुर्ल्यात ओळख निर्माण झाली होती. अल्पशा आजारामुळे ते अचानक निघून गेल्याने वेंगुर्ल्यात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.