
सावर्डे : गांधीजींचे विचार युवा पिढीत संक्रमित होऊन त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या मध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी. गांधीजींनी आयुष्यामध्ये जपलेल्या नीती मूल्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या मध्ये होणे अपेक्षित असून प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छतेचे महत्व समजावे व विद्यार्थ्यांच्या मार्फत घराघरात हा संदेश पोहोचावा याची जाणीव व जागृती युवा पिढीमध्ये व्हावी या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगाव मार्फत दरवर्षी गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
सदर स्पर्धा राज्यस्तरीय असून या स्पर्धेमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.गांधी विचार संस्कार परीक्षेचे माध्यम मराठी,हिंदी,इंग्रजी,गुजराती व कन्नड आहे.इ.5वी ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांनाही परीक्षेत सहभाग घेता येतो.फाऊंडेशन कडून प्रत्येक इयत्तेनुरूप विविध जीवनमूल्यांची ओळख करून देणाऱ्या विचारांवर आधारित अभ्यासक्रमाचे स्वतंत्र पुस्तक दिले जाते.
सदर परीक्षेत विद्यालयातील इ.5वी -113 , इ.6वी -119 , इ.7वी -78 , इ.8वी 197 , इ.9वी -225 इ.10वी -223 ,इ.11वी -399 , इ.12वी -344 असे एकूण 1698 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. जगाला प्रेरक ठरलेल्या मूल्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांकडून व्हावा या अपेक्षेने सदर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.