
दोडामार्ग : दोडामार्ग शहरात काल रात्रोच्यावेळी घरात घुसून एका महिला व तिच्या बारा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आवाडे येथील एका मुस्लिम युवकाला नुकताच काही युवकांनी चांगलाच चोप दिला. मात्र महिलेच्या घरात घुसून त्या महिलेवर व तिच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा केलेला प्रसंग हा अतिशय दृशकृत्य असून त्या युवकांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच त्या युवकांवर कठोर कारवाई न झाल्यास आचारसंहिता संपताच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशाराही महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.
येथील महायुतीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या महिला बोलत होत्या. यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, शिवसेना महिला तालुकाध्यक्ष चेतन गडेकर, सानवी गवस, भाजप जिल्हा कार्यकारणी प्रमुख सुजाता मणेरीकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अश्विनी शिरोडकर, शहरप्रमुख शीतल हरमलकर, उपतालुका प्रमुख लक्ष्मी करमळकर, विभाग प्रमुख गुणवंती गावडे आदी उपस्थित होते.
जाती- पाती न बघता समाजकंटकांवर कारवाई गरजेची
यावेळी बोलताना दीक्षा महालकर म्हणाल्या की, आवाडे येथील रेहान लतिफ नावाचा हा मुस्लिम धर्मीय युवक आहे. या युवकाने केलेले कृत्य हे काळीमा फासणारे आहे. त्यामुळे अशा युवकांवर कठोरातील कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. रेहान लतिफ याच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरणार असल्याचेही यावेळी या महिलांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कोणत्याही पक्षाने अभय देऊ नये
महालकर बोलताना पुढे म्हणाल्या की, रेहान लतिफ हा एका पक्षाचा पदाधिकारी आहे. तो कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे त्याच्याजवळ कोणते पद आहे हे काहीही महत्त्वाचे नसून त्याने केलेले कृत्य हे गैर असून त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला कोणत्याही राजकीय पक्षाने अभय देऊ नये असेही महालकर यांनी स्पष्ट केले.