
चिपळूण : विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, गुहागर तालुक्यातील बौद्ध समाजाच्या विविध संघटना एकवटल्या आहेत.
वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर रविवारी दुपारी सव्वा एक च्या दरम्यान गुहागर तालुक्यातील नरवण येथे धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ऐन निवडणूक मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामुळे गुहागर तालुक्यात खळबळ माजली आहे. हा हल्ला राजकीय हेतूने झाला की, यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
बौद्ध समाजातील कोणाही व्यक्तीवर झालेला भ्याड हल्ला ,एका व्यक्तीवर नसून समाजावर झालेला आहे आणि तो आम्ही सहन करणार नाही.आरोपींन लवकरात लवकर अटक होऊन, त्यांना कठोर सजा झाली पाहिजे. अण्णा जाधव यांच्यावरील भ्याड हल्ल्यातील दोषींना योग्य शासन झाले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवण्यासाठी गुुहागर तालुक्यातील सर्व संघटना एकवटल्या आहेत. बौद्धजन सहकारी संघ गुहागर ,भारतीय बौध्द महासभा तालुका गुहागर, भारतीय बुद्ध शासन सभा तालुका गुहागर आदी संघटना एकत्र येत, गुहागर तालुक्यातील जानवळे येथे सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अण्णा जाधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आणि शांततेच्या मार्गाने तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि संबंधित शासकीय यंत्रणांना निवेदन देत, अण्णा जाधवांवर भ्याड हल्ला करणार्यांना त्वरित अटक करून कारवाई करण्यात यावी अशी आग्रही भूमिका घेण्यात आली.
यावेळी बौद्धजन सहकारी संघ गुहागर तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, भीमसेन सावंत, विजू अप्पा कदम, सचिन मोहिते, दिनेश कदम, उत्तम पवार, सिद्धार्थ गमरे, मंदार हुलसार, शशिकांत जाधव, चंद्रकांत मोहिते, सुभाष जाधव, रत्नदीप जाधव, संतोष मोहिते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.