
सिंधुदुर्ग : मुंबई येथील नाईक मराठा मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर येथील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण तपस्वी स्व.शशिकांत उर्फ दादा अणावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेले सामाजिक, सार्वजनिक,राजकीय आणि विशेषत: शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची संस्थेने दखल घेऊन त्यांना मरणोत्तर "समाज गौरव " पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिंदाल स्टील समुहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट पुष्कराज कोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
हा सोहळा रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा.कुडाळ येथील गुलमोहर हाॅटेलनजीक महालक्ष्मी हाॅलमध्ये संपन्न होणार आहे.
तसेच प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही देवळी समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पारितोषिके, इयत्ता ५ते १२ मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निराधार महिला आणि दुर्बल घटकातील रूग्णाना शस्त्रक्रियेसाठी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर असून विशेष अतिथी म्हणून गोवा येथील विद्याभारती शैक्षणिक संघटनेचे कार्याध्यक्ष प्राचार्य गजानन मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास ज्ञाती बांधव, दादा अणावकर यांच्या संस्थेचे शिक्षक, कर्मचारी वर्ग हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संयुक्त कार्यवाह, पत्रकार किरण नाईक यांनी केले आहे.