
राजापूर : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून येथे मोठे बंदर, ब्रिटिशांनी व्यापार उदिमाच्या सोईसाठी वखार वसवली होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वखारीवर आक्रमक करून ताब्यात घेतली होती. इतिहासात या घटनांची नोंद आहे. याच वखारीत पूर्वी राजापूर तहसीलदार कार्यालय, पोलीस ठाणे होते. त्या ठिकाणी दोन तोफा होत्या सन १९७९ मध्ये तहसीलदार कार्यालय व पोलीस ठाणे स्थलांतरित करून आता, असलेल्या ठिकाणी आणले गेले. तेव्हा तोफा ही आणण्यात आल्या त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वार येथे ठेवण्यात आल्या. राजापूर मधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे उदघाटन १५ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आले. सुशोभीकरण झाल्यावर ऐतिहासिक तोफा स्मारकाच्या ठिकाणी ठेवण्याचा शिवस्मारक जिर्णोद्धार समितीचा मानस होता. जिर्णोद्धार समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी, स्थानीक ज्येष्ठ नागरिक राजाराम यशवंत रसाळ वय ७५ वर्षे यांनी ऐतिहासिक तोफांची माहिती घेण्यासाठी दिनांक २ जून २०१७ रोजी तहसीलदार कार्यालयात पत्रव्यवहार केला.
परंतु, काही माहिती मिळत नाही म्हणून त्यांनी प्रांत कार्यालयात १० एप्रिल २०१८ रोजी पत्रव्यवहार केला. तेथूनही प्रतिसाद मिळत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी तहसीलदार कार्यालयात माहितीचा अधिकार-२००५ अन्वये, जड वस्तुसंग्रहालय अभिलेख पुस्तकातील उतार्याची मागणी केली.
तेव्हा तत्कालीन निवासी नायब तहसीलदार यांनी अभिलेखातील उतार्याची छायांकित, साक्षांकित प्रत दिली. त्यामध्ये ५ तोफा व ५ तोफांचे गोळे असल्याचे नोंदीनुसार आढळून आले. मात्र, तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वार येथे एक तोफ असल्याचे निदर्शनास येते. उर्वरित ऐतिहासिक तोफा व तोफांचे गोळे यांचे काय झाले याची माहिती नाही. महाराष्ट्र शासनाच्या पुरातन वास्तू जतन विभागाने याची दखल घ्यावी अशी मागणी राजापूर शहरातील शिवप्रेमी करीत आहेत.