
सावंतवाडी : मतदान कोणाला करणार ? असा सवाल करत शहरातील एका प्राध्यापकावर हात घालण्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. एका 'अपक्ष' उमेदवाराच्या समर्थकाकडून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. प्राध्यापक ठाकरे गटाचे कित्येक वर्षे समर्थ आहेत असे सांगत त्या समर्थकांकडून प्राध्यापकास अश्लील शिविगाळ केल्याची घटना सावंतवाडीत घडली. काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्राध्यापकावर मतदान केंद्राची जबाबदारी असून रात्री ते घरी आले. यानंतर त्यांच्या घराबाहेर हा प्रकार घडला. याबाबत संबंधित प्राध्यापकाने पोलिसांत एनसी दाखल केली. तक्रारदार यांच्या निवासस्थानानजिक ते वाड्यातील मित्रांशी बोलत असताना यातील समर्थकांनी तुम्ही मत कोणाला घालणार ? असे दाबात विचारले. त्यावेळी एकाने ते उद्धव ठाकरे गटाचे कित्येक वर्षे समर्थक असल्यामुळे ते आमच्या उमेदवाराला मत घालणार नाहीत असे म्हणून तक्रारदार यांना शिवीगाळी केली. त्यातील एकाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच अंगावर येवुन तुम्हाला महागात पडेल अशी धमकी दिली. प्राध्यापकाच्या शर्टची कॉलर पकडुन ओढत नेवुन गाडीवर ढकलुन दिले. त्यानंतर पोलीसात तक्रार कर, माझे कोणीही वाकड करू शकत नाही व पुढील परीणामास तयार रहा अशी धमकी दिली.
याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकारचा सर्वस्तरातून निषेध नोंदविला जात आहे. याबाबतची तक्रार संबंधिताकडून देण्यात आली असून पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी दुजोरा दिला आहे. संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर हे प्रकरण सामंजस्याने मिटवण्यात आल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.