
सावंतवाडी : शहरात व गावामध्ये छोटे-मोठे अपघात होत असतात. परंतु, एखादा मोठा अपघात झाल्यास रुग्णाला बांबुळी गोवा येथे पाठवण्यात येते. परंतु, छोट्या छोट्या अपघातग्रस्त रुग्णांना गोवा बांबुळी येथे पाठवणे योग्य आहे का? असा सवाल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून करण्यात आला. तर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला मतदार संघामध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराने सर्वप्रथम हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केले आहे.
आज सकाळी कणकवली येथील शाळकरी लहान मुलींचा रेल्वेतून पडून अपघात झाला. त्यामध्ये त्यांना थोडीफार इजा झाली. अवयवांवर ट्रीटमेंट करणारे डॉक्टर व सक्षमयंत्रणेंच्या अभावामुळे त्या अपघातग्रस्त मुलींना सरळ गोवा बांबूळीला पाठवण्यात आले. त्यामुळे कणकवली वरून धावपळ करून येणाऱ्या पालकांची भलतीच ओढाताण झाली. हे असं नेहमीच होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये पालक किंवा नातेवाईकांची वाट पहावी की त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी कुणी मिळेल त्याला घेऊन बांबुळी गाठावी असा एक प्रश्न समोर उभा राहतो. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला कुठचाही विचार न करता या सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागते.
काही वेळा तर 108 ॲम्बुलन्स वेळेत मिळत नसल्याने पेशंटचे विनाकारण हाल होतात. तर कधी कधी ॲम्बुलन्स वेळेत न मिळाल्यास पेशंटला जीव गमावा लागतो. या परिस्थितीला जबाबदार कोण? म्हणूनच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान विनंती करतो की, हॉस्पिटलचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावा. येथे कुणाच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा दुर्दैवाने जीव जात आहे. ज्याप्रमाणे राजकारणामध्ये नेहमीच गाजावाजा होतो त्याचप्रमाणे येथील गोरगरीब जनतेला मूलभूत सोयी सुविधां मिळण्याकरिता गाजावाजा होणे आज काळाची गरज आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जसं शक्य होईल तसं अशा परिस्थितीमध्ये हातातील काम टाकून अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. परंतु कधी कधी असं म्हणायची पाळी येते की "ज्याचं जातं त्यांनाच कळतं". आपण सर्वच राजकीय नेते या मूलभूत सोयीसुविधांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सक्षम आहात. फक्त मनापासून थोडा वेळ या जनतेच्या मूलभूत हक्कासाठी द्या अशी विनंती त्यांनी केली आहे.