'वंचित' आघाडीकडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची कारवाई
Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2024 12:13 PM
views 378  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. याच अनुषंगाने प्रदीप कांबळे (सावंतवाडी शहर), मानसी सांगेलकर (सावंतवाडी शहर), आनंद जाधव (सहसचिव सावंतवाडी) नवसो कदम (तालुकाध्यक्ष - दोडामार्ग), तसेच चेतन जाधव, संदेश जाधव, विनोद कदम व कांशीराम असंनकर (शाखा अध्यक्ष असनिये) या पदाधिकाऱ्यांची वंचित बहुजन आघाडीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या राजन तेली यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. हा पक्षाच्या शिस्तीचा भंग असून शिस्तबंग केल्याबद्दल या आठ कार्यकर्त्यांची वंचित बहुजन आघाडीकडून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

दरम्यान सावंतवाडी तालुका विधानसभा क्षेत्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व जनतेने याची नोंद घ्यावी, असे प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कळविले आहे.