
चिपळूण : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थेच्या कोकणात, लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीजवळ, लोटे - घाणेखुंट येथे सुरु असलेल्या परशुराम हॉस्पिटल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्सेस येथे गेली अनेक वर्षे, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि हॉस्पिटल अशी सेवा उत्तम प्रकारे सुरु आहे.
संस्थेच्या उत्तर रत्नागिरी भागात लोटे घाणेखुंट येथील, परशुराम रुग्णालयात अत्यल्प शुल्क आकारून, सुरु असलेली उत्तम रुग्णसेवा, येथील ग्रामीण जनता, औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय यांना फारच उपयुक्त ठरलेली आहे. या रुग्णसेवेचा आढावा घेऊन आणि येथील जनतेची गरज लक्षात घेऊन शासनाने , या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांना मान्यता दिली आहे. वरिल दोन्ही योजनांचे कार्डधारक रुग्णांना, पुढील १५ दिवसांत, अत्यंत अवघड शस्त्रक्रिया,अतिदक्षता विभाग, औषधोपचार आदी सेवा विनामूल्य उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत भाकरे यांनी कोकणसादला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, या योजनांतर्गत जनरल सर्जरी,ऑप्थामोलॉजी सर्जरी, ऑर्थोपेडीक सर्जरी, गायनॅकॉलॉजि ॲण्ड ऑबस्टेट्रिक्स सर्जरी, सर्बिया गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, युरोलॉजिकल सर्जरी, पॉलिट्रामा, क्रिटिकल केअर- आयसीयु, एन.आय.सी.यु. व्यवस्था, पल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अशा ११ प्रकारच्या आजारांवर विशेष उपचार ( स्पेशालिटी ट्रिटमेंट) उपलब्ध होणार आहेत.
डॉ. भाकरे म्हणाले की, चिपळूण, खेड, दापोली , मंडणगड, गुहागर आणि आसपास परिसरातील या दोन्ही योजनेचे कार्डधारक ग्रामीण जनतेला , या तालुक्यांमधील सुमारे ६ हजारहून अधिक असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. तसेच लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील सुमारे १० हजार कर्मचारी आणि कुटुंबीयांनाही इएसआयएस अंतर्गत या सुविधेचा फायदा होईल. याविषयी अधिक माहिती लोकांना आपल्या गावातील ग्रामपंचायत, आशावर्कर सेविका यांच्याकडून मिळेल. त्याचबरोबर परशुराम रुग्णालयात याविषयावरील माहितीसाठी विशेष सेवा कक्ष सुरु केले आहे. या योजनेसाठी सेवा कक्षात शासन नियुक्त कायम स्वरूपी आरोग्यमित्र उपलब्ध असणार आहे.
डॉ. श्यामकांत भाकरे रुग्णालयातील सर्वांविषयी माहिती देताना म्हणाले, दोन वर्षांपूर्वी डाऊ कंपनीने, सी. एस. आर. मधुन अल्ट्रासोनोग्राफी चे रुपये ३५ लाख किंमतीचे अत्याधुनिक मशिन रुग्णालयास दिले. यामुळे दोन वर्षांत परिसरातील सुमारे ४ हजार रुग्णांना खाजगी सुविधेपेक्षा ५०० रुपयांनी स्वस्त दरात सेवा दिली आहे. रुग्णालयातील सर्व उपचार सुविधा सर्वसामान्यांसाठीही खाजगी रुग्णालयातील शुल्कांपेक्षा ४० ते ५० टक्के सवलतीच्या दरात कायम सुरु आहेत.
संस्थेची माहिती देताना ते म्हणाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेद महाविद्यालयातून अनेक उत्तम आयुर्वेद डॉक्टर तयार होऊन देशभर रुग्णसेवा करीत आहेत. तर नर्सिंग कॉलेजमधून असंख्य स्थानिक मुली शिकून देशात आणि देशाबाहेर विविध नामवंत हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी करीत आहेत. काही मुली परशुराम हॉस्पिटलमध्येच नोकरी करत आहेत, तर काही नर्सिंग कॉलेजलाच शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत.