गावठी बॉम्ब पेरलेल्या आरोपीना अटकपूर्व जामिन मंजूर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 09, 2024 15:08 PM
views 328  views

सावंतवाडी : शिकारीच्या इराद्याने गावठी बॉम्ब पेरलेल्या आरोपीना अटकपूर्व जामिन मंजूर झाला.आरोपींच्या वतीने अँड. परिमल नाईक, अँड. सुशील राजगे, अँड. रश्मी नाईक, अँड. अमिषा बांदेकर यांनी काम पाहिले. आरोपी अबिर प्रकाश आंगचेकर, चंद्रकांत शंकर दळवी, दोन्हीं राहणार सांगेली व शांताराम गोपाळ राऊळ आंगचेकर राहणार आंबेगांव  वन खात्याच्या संरक्षित क्षेत्रात शिकारीच्या हेतूने गावठी बॉम्ब पेरून ठेवल्याची विश्वसनीय बातमी मिळाल्यावरून त्यांच्या विरुद्ध वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९५१,५२ व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड, ६५- अंतर्गत WL ०१/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता. त्याचं तपासकाम वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर हे करत होते. दरम्यान आरोपीना अटक करून त्यांना रीतसर न्यायालयात जामिन सुद्धा मंजूर केला होता. 

तपासा दरम्यान आरोपीनी ज्वलनशील बॉम्ब पदार्थ वापरल्याचे निष्पन्न झाल्याने व गुन्ह्यात तपासकाम करण्याचा अधिकार वन अधिकारी यांना नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन पुन्हा भारतीय बारी कायदा १९०८ चे कलम ४ व वन्य जीव संरक्षण कायदा तसेच भारतीय वन अधिनियम तरतुदीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कायद्या नुसार खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्याला जन्मठेपेची शिक्षा निर्देशीत केलेली आहे. तदनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्या मार्फत पुढील तपास काम चालू असताना आरोपीना या पूर्वी मंजूर झालेला जामिन रद्दबातल व्हावा यासाठी अहवाल सादर करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक होण्याची साधार भीती आरोपीना वाटत असल्याने त्यांनी अँड. परिमल नाईक यांच्या वतीने सिंधुदुर्ग, ओरोस येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीना साठी अर्ज दाखल केला होता. 

या कामी सुनावणी होऊन आरोपीविरुद्ध या अगोदरच तापसकाम जवळजवळ पूर्ण झालेलं असून आरोपिंच्या अटकेची आवश्यकता नाही असे व इतर मुद्दे अँड. परिमल नाईक यांच्या वतीने मांडण्यात आले. हे मुद्दे ग्राह्य मानून सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी सर्व आरोपीना अटकपूर्व जामिन मंजूर केला.