अल्पवयीन युवती अपहरण लैंगिक अत्याचार प्रकरण ; आरोपीची जामिनावर मुक्तता

Edited by: संदीप देसाई
Published on: October 09, 2024 15:02 PM
views 604  views

कणकवली :  फोंडाघाट - बावीचे भाटले येथील दिपक गंगाराम चौगुले याची ओरोस विशेष न्यायालयाने अल्पवयीन युवतीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केले प्रकरणी सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.

     थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पिडीत अल्पवयीन मुलगी ही कॉलेज मध्ये जण्याकरीता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती सापडू शकली नाही. त्यामुळे तिच्या अज्ञानाचा फायदा घेवुन तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवुन नेले.अशी  फिर्याद पोलिसांकडे देण्यात आली.त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला.  

    त्यानंतर गुन्हयातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी ही मिळुन आल्याने अल्पवयीन मुलगी हीला पोलीस उपनिरिक्षक आर.बी. शेळके (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. त्यानंतर महिला पोलीस उपनिरिक्षक यांनी तिला विश्वासात घेवून तिच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता तिने सांगितले की, तिचा मित्र दिपक गंगाराम चौगुले (वय-२७ वर्ष रा. बाविचे भाटले ता. कणकवली) हा तिला जबरदस्तीने फोंडाघाट एस.टी स्टँड वरुन हिंदळे - देवगड येथे त्याच्या पाहुण्यांचे घरी घेवुन गेला होता. त्यानंतर तिथून हिंदळे बाजारपेठेत रुम भाडयाने घेवून तेथे ते दोघेजण राहत असताना आरोपी दिपक गंगाराम चौगुले याने पिडित हीच्याकडे शारिरीक संबंधाची मागणी केली. मात्र त्यास पिडित अल्वयीन मुलगी हिने नकार दिला.परंतु आरोपीने पिडित हीला मी तुझ्याशी लग्न करणार असे बोलून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अशी माहितीही त्या अल्पवयीन मुलीने महिला पोलिसांना दिली.

     त्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१), ६४(२)(i), ६९ सह  बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८,१२ प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर विशेष न्यायाधीश ओरोस यांनी आरोपीची सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.