
सावंतवाडी : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सावंतवाडी मंडळाचा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुंबई माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख पारितोषिक असे या पारितोषिकाचे स्वरूप असून चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव मंदार नार्वेकर यांना हे पारितोषिक देऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राघू चितारी, खजिनदार योगेश सुराणा, सदस्य निलेश वेर्णेकर, राकेश दळवी आदी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या चिताराळी मंडळाला ३४ वर्ष झाली असून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम मंडळाने राबविले आहेत. अत्यंत सुबक व आकर्षक अशी भव्य गणेश मूर्ती व विविध समाज प्रबोधन करणारे व आध्यात्मिक संदेश देणारे चलतचित्र देखावे हे या मंडळाचे खास आकर्षण असते. हे देखावे पाहण्यासाठी सावंतवाडी शहरा बरोबरच सावंतवाडी तालुका व जिल्ह्यातील अनेक भक्तगण उपस्थित राहत असतात.या मंडळाने महाराष्ट्र शासनाचा यंदाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्याचे पारितोषिक वितरण आज मुंबई येथे झालेल्या समारंभात आज करण्यात आले. यासाठी मंडळाचे सचिव मंदार नार्वेकर, उपाध्यक्ष राघवेंद्र चितारी तसेच खजिनदार योगेश सुराणा यांच्यासह चितार आळी मंडळाच्या सदस्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.