
चिपळूण : थकीत कराबाबत जिल्हा परिषदेने गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या बाजूने निकाल देऊनही , रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्या रत्नागिरी गॅस ऑर्डर पॉवर प्रा.लि. कंपनीने , आमदार भास्कर जाधवांच्या दणक्याने सात दिवसांत , सन २०२१ ते २०२३ या दोन वर्षांतील थकीत कर रक्कमपैकी २५ टक्के रक्कम देण्याची कबुली दिली आहे.
गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीत वसलेल्या , रत्नागिरी गॅस ॲण्ड पॉवर प्रा.लि. ने आपण सरकारी कंपनी आहोत, आम्ही एम आय डी सी ला कर देतो, अशी भूमिका घेऊन ग्रामपंचायत कर देण्यास नकार दिला होता. कंपनीने अंजनवेल, रानवी, वेलदूर या ग्रामपंचायतींची वार्षिक कराची रक्कम थकवलेली आहे. थकित कराबाबत जिल्हा परिषदेने ४ एप्रिल २०२४ रोजी ग्रामपंचायतींच्या बाजूने निकाल देऊनही रत्नागिरी गॅस ॲण्ड पॉवर प्रा.लि. कंपनी, ग्रामपंचायतींंना कराची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी बैठक बोलावली होती.
बैठकीला तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक, गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, विस्तार अधिकारी शरद भांड, एम.आय.डी.सी.चे अधिकारी, ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, कंपनीचे अधिकारी स्नेहाशिष भट्टाचार्य, आशिष पांडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत कंपनीचे अधिकारी, जिल्हा परिषद निकाला विरोधात कंपनीने २८ एप्रिल ला हायकोर्टात पिटीशन दाखल केले आहे, कंपनीची सहकारी कंपनी एल.एन.जी.ने त्यांच्या वाट्याची रक्कम अद्याप दिलेली नाही, अशी खोटी कारणे देऊन, उडवा उडवीची उत्तरे देत कराची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र आमदार जाधवांनी कोर्टाचे पुरावे मागितल्यावर कंपनीचे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. जिल्हा परिषद निर्णयाविरोधात कोकण आयुक्तांकडे अपील करणे अपेक्षित असताना, हे अधिकारी हायकोर्टात पिटीशन दाखल केल्याचे खोटे सांगत, असल्याचे बैठकीत सर्वांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी अशी खोटी आणि उडवा उडवीची उत्तरे देण्याची तुमची हिंमतच कशी झाली असे विचारत अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. परिणामी कंपनी अधिकाऱ्यांनी
२०२१ ते २०२३ दोन वर्षांतील थकीत कराच्या रक्कमपैकी २५ टक्के
रक्कम येत्या सात दिवसांत ग्रामपंचायतींंना देण्याचे कबूल केेले आहे . बैठकीत आमदार भास्कर जाधवांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडीत पकडीत जाब विचारल्याने, कंपनी प्रशासन नरमल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे गुहागर तालुक्यात सर्वत्र आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यपद्धती आणि कौशल्याची चर्चा आहे.