नगरपरिषदेच्या आश्वासनानंतर सौरभ कांबळी यांचे उपोषण मागे

सुनील डुबळे यांची यशस्वी मध्यस्थी
Edited by: दिपेश परब
Published on: October 02, 2024 13:24 PM
views 694  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या हद्दीतील गावडेश्वर मंदिरच्या शेजारी असलेल्या आपल्या मालकीच्या जमिनीवर काहींनी आपल्या वडिलांना फूस लावून ९९ वर्षांचा भाडेकरार साध्या १०० रु च्या बॉण्ड पेपरवर केला. तसेच आता आम्हाला त्या आमच्या जमिनीवर बांधकाम करायचे असताना अनेक अडथळे ती व्यक्ती आणत असून नगरपरिषदेकडून बांधकाम परवानगी मिळत नसल्याचा आरोप करत त्या जमीनीचे मालक सलील जगन्नाथ कांबळी यांचा मुलगा सौरभ सलील कांबळी याने आज २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालया समोर उपोषण करत आत्मदाहनाचा इशारा दिला होता. 

   यावेळी शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे यांनी सौरभ कडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याशी चर्चा करत यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, आज  नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास बसला आहात. आपणास नगरपरिषदेकडुन यापूर्वी देण्यात आलेली बांधकाम परवानगी आपण विहीत कालावधीत बांधकाम सुरु न केल्यामुळे कालबाहय झालेली आहे. आपणास सुचित करण्यात येते कि, शासनाने इमारत बांधकाम परवानगी देणकामी नव्याने BPMS ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. सदर BPMS ऑनलाईन प्रणालीवर आपण अनुज्ञाप्ती अभियंता/वास्तुविशारद यांचे माध्यमातुन मालकी हक्काच्या विहीत कागदपत्रासह ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करावा. आपण ऑनलाईल पध्दतीने सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी पुर्ण केल्यानंतर सादर केलेले आराखडे शासनाने मंजुर केलेल्या विकास नियंत्रण नियमावली नुसार (UDCPR) योग्य असल्यास नियमानुसार ऑनलाईन पध्दतीने बांधकाम परवानगी देणेबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करता येणारी आहे. असे या पत्रात म्हटले आहे.