
रत्नागिरी : पालघर येथे झालेल्या १९ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी एक सुवर्ण, चार रौप्य व पाच कांस्यपदके पटकावली. पोलिस फोटोग्राफी स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरी जिल्ह्याने पटकावले.
एकोणिसावा कोकण परिक्षेत्रीय पोलिस कर्तव्य मेळावा पोलिस अधीक्षक कार्यालय पालघर येथे झाला. मेळाव्यात रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे ग्रामीण व पालघर या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये तपास, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, कॉम्प्युटर अवेअरनेस, श्वान कॉम्पिटेशन या स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये फॉरेन्सिक टेस्ट स्पर्धेत पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांना ब्रॉन्झ पदक, पोलिस फोटोग्राफीत पोलिस हवालदार अमोल अरूण गमरेना सुवर्णपदक, पोलिस व्हिडिओग्राफीत महिला पोलिस शिपाई पूजा गायकवाड यांना ब्रॉन्झ पदक, कॉम्प्युटर अवेअरनेसमध्ये पोलिस शिपाई सूरज सुर्वेंना सिल्वर व ब्रॉन्झ पदक, गुन्हे श्वानपथक प्रकारात श्वान रॅम्बोने ब्रॉन्झ पदक मिळाले.
प्रथम हस्तक म्हणून पोलिस हवालदार भूषण राणे आणि द्वितीय हस्तक म्हणून पोलिस हवालदार वैभव आंब्रे यांना सन्मानित केले गेले. अंमली पदार्थविरोधी तपासणीत श्वान व्हीक्टरने ब्रॉन्झ पदक मिळवले. त्यामध्ये प्रथम हस्तक म्हणून पोलिस हवालदार सूरज भोळे आणि द्वितीय हस्तक म्हणून पोलिस हवालदार नागनाथ पाचवे यांची निवड झाली. अँटीसबोटीज चेकिंग (रूम सर्च) प्रकारात पोलिस हवालदार नीलेश भागवत यांना ब्रॉन्झ पदक, अँटीसबोटीज चेकिंगमध्ये सिल्वर व ब्रॉन्झ पदक मिळाले असून, पोलिस हवालदार नितीन डोळस यांनी ही पदके मिळवली आहेत.