
देवगड : देवगड जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यांना रोख रक्कम ५ लाख व गौरवपत्र असे द्वितीय पुरस्काराचे स्वरूप आहे .शाळेचे मूल्यांकन शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांचे समिती मार्फत करण्यात आले होते. प्रशालेचे संस्थाध्यक्ष, कार्यवाह, शाला समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, पालक, नागरिक यांच्या योगदानातून हे यश प्राप्त झाले आहे.
विद्या विकास मंडळ जामसंडे या संस्थेचे अध्यक्ष एड. अजितराव गोगटे, कार्यवाह प्रवीण जोग, शाला समिती अध्यक्ष प्रसाद मोंडकर, अन्य सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय गोगटे, पालक, ग्रामस्थ या सर्वांनी प्रशालेला मिळालेल्या यशाबद्दल प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग,विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक वर्ग यांनीअभिनंदन केले आहे .माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षांमधील उत्कृष्ठ निकालाबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षा, एन .एम .एम .एस परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ओलंपियाड परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, निबंध स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी सतत आघाडीवर असतात.
बोलक्या भिंती , अद्ययावत प्रयोग शाळा,अद्ययावत संगणक लॅब ,वाचनालय ,गांडूळ खत प्रकल्प , परसबाग ,अद्ययावत सीसी टीव्ही यंत्रणा , समाजशास्त्र प्रयोग शाळा ,भाषा प्रयोगशाळा ,वाचन कट्टा ,रेनहार्वेस्टिंग प्रकल्प ,सौरऊर्जा प्रकल्प , दप्तराचे ओझे कमी करणारा प्रकल्प इत्यादी प्रकल्प शाळेच्या नावलौकिकात भर घालणारे आहेत.तसेच प्रशालेत उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, कला, क्रीडा,भौतिक सुविधा, यांचे ही प्रतिबिंब या निकालात दिसून आले आहे.