
दोडामार्ग : महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षण अंमलबजावणी करणेबाबतची मागणी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे अध्यक्ष नवल गावडे व सरचिटणीस देवेंद्र गावडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत येथील तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे महाराष्ट्रात धनगर समाजाची जवळपास ७० वर्षापासून घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या खात्याच्या राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. महाराष्ट्रात कुठेही "धनगड अस्तित्वात नाहीत जे आहेत ते धनगर आहेत". या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे आता अंमलबजावणी करणे योग्य वाटते. पंढरपूर, लातूर, नेवासा येथे या मागणीसाठी १४ दिवसांपासून धनगर कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्या उपोषण कर्त्यांच्या मागणीस दोडामार्ग तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांचा पाठिंबा असून शासनाने तात्काळ धनगर अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ, मुंबईचे अध्यक्ष नवल गावडे व सरचिटणीस देवेंद्र गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.