
वैभववाडी : तालुक्यात विजांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने अक्षरक्ष झोडपुन काढले. या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुसळधारेने हळव्या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सलग चार दिवस सायंकाळच्या वेळी पावसाची संततधार सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेली चार दिवस तालुक्यातील विविध भागात पावसाने झोडपले आहे. विवारी सायकांळी तालुक्याच्या सह्याद्री पट्यातील सर्वच गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या.
दरम्यान आज पहाटेपासुन तालुक्यात पावसाचे वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती.दुपारी बारा वाजल्यापासुन सुरूवातीला मध्यम स्वरूपाच्या सरींना सुरूवात झाली. त्यानतंर पावसामध्ये वाढ होत गेली. सायकांळी विजांच्या गडगडाटांसह पावसाचा जोर वाढला. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागली आहे. तालुक्यातील शुक, शांती, अरुणा, गोठणा या सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पावसाचा तालुक्यातील हळव्या भातपिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय ७० भातपिक फुलोऱ्यांवर आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहील्यास त्या पिकाला देखील धोका निर्माण होणार आहे.