महाराष्ट्र पणन महासंघाच्या कोकण उपससमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 23, 2024 13:15 PM
views 134  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या कोकण उपससमितीच्या अध्यक्षपदी प्रमोद रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. कोकणात नाचणी खरेदी,काजु बी खरेदी आणि काजु बी प्रकिया उद्योग सुरू करण्याच्या हेतुने पणन महासंघाच्यावतीने ही उपसमिती गठित केली आहे. 

कोकणातील रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि कोल्हापुर जिल्हयातील चंदगड आजरा या भागात काजु बी चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु मागील काही वर्षापासुन काजु बी दराचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. उत्पादनखर्चापेक्षा कमी दराने काजु बी खरेदी केली जात असल्याचा आरोप काजु उत्पादकांकडुन केला जात आहे. काजु बी खरेदी करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नसल्याने कुणाचाही अकुंश या खरेदी विक्रीवर नसल्याने काजु उत्पादकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने काजु बी खरेदी आणि काजु बी प्रकिया उद्योग उभारणे आणि नाचणी खरेदी या विषयांवर काम करण्यासाठी उपसमिती गठित केली आहे. 

या उपसमितीच्या अध्यक्षपदी पणनचे सिंधुदुर्गातील संचालक प्रमोद पुंडलिंक रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय या उपसमितीचे सदस्य म्हणुन पांडुरंग घुगे, धनश्रीदेवी घाटगे, अयोध्या भागवतराव घस,एस.व्ही बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या उपसमितीच्या माध्यमातुन सिंधुदुर्गातील सर्व तालुका खरेदी विक्री संघ आणि विविध संस्थांची बैठक सिंधुदुर्ग येथे उद्या (ता.२४) सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे.