
वसई : महेश केळुसकर यांच्यासारखे समकालीन इमानदार प्रतिभावंत कवी जेव्हा वर्तमान राजकीय परिस्थितीवर भेदक कविता भाष्ये करतात तेव्हा ती गंभीरपणे घ्यावी लागतात, असे प्रतिपादन डॉ.सिसिलिया कार्व्हालो यांनी रविवारी संध्याकाळी वसई येथे केले. महेश केळुसकर यांचा अष्टगंध प्रकाशन निर्मित बारावा कविता संग्रह ' बेईमाने बेइतबारे' चे समाजोन्नती मंडळ सभागृहात डॉ.कार्व्हालो यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी केळुसकरांच्या हास्य-व्यंग कवितांची ताकद राजकीय मंडळींना अस्वस्थ करत असल्याचे सांगितले.
'भ्रष्टाचार ,अन्याय, भेदभाव ,अत्याचार पूर्वीही होते आणि आताही आहेत. पण पूर्वी त्याबद्दल चीड होती आणि आज बधीरता आहे. एका जखमी काळात आपण सारे अस्वस्थपणे जगतो आहोत आणि हे असं जगणं मी माझ्या राजकीय कवितांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत असतो' ,अशा शब्दांत महेश केळुसकर यांनी आपली भूमिका विशद केली. याप्रसंगी अष्टगंध प्रकाशनचे संजय शिंदे यांनी केळुसकरांच्या राजकीय कविता प्रकाशित करणे हे धोकादायक काम असल्याचे नमूद केले.
वसईचे ज्येष्ठ साहित्यिकर्मी दिवंगत हरिभाऊ म्हात्रे यांच्या कन्या वंदना विकास वर्तक आणि कुटुंबीयांनी हरिभाऊंच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित केलेल्या तिसऱ्या नवोदित काव्य स्पर्धेत 50 कवींनी भाग घेतला. डॉ .निर्मोही फडके आणि कवी फेलिक्स डिसूजा यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. सुषमा राऊत आणि शिल्पा पै परुळेकर यांनी या कविसंमेलनाचे रंगतदार सूत्रसंचालन केले.
ज्येष्ठ प्रकाशक अशोक मुळे, प्रथम महापौर नारायण मानकर, नगरसेवक संदेश जाधव, संगीतकार अभिजीत लिमये आणि असंख्य रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.