सिंधुदुर्ग : देवळी ज्ञातीच्या नाईक मराठा मंडळ या संस्थेच्या कार्यात अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्य केलेल्या, स्व. मधुकर उर्फ बाबा आचरेकर यांच्या स्मरणार्थ यंदाचा *"समाज महर्षी"* पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर येथील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष,शिक्षण तपस्वी स्व.शशिकांत उर्फ दादा अणावकर यांना मरणोत्तर पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, जेएसडब्लु या नामांकित समुहाचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट,श्री. पुष्कराज कोले यांच्या हस्ते अणावकर कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून गोवा येथील "विद्याभारती" शैक्षणिक संघटनेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य श्री.गजानन मांद्रेकर उपस्थित राहणार आहेत.
स्व. बाबा आचरेकर यांनी संस्था,ज्ञाती बांधव आणि समाजातील मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी तन,मन आणि स्वधन अर्पण करून ५०वर्षे समाजकार्य केले. वयाच्या शहाण्णव वर्षापर्यंत ते कार्यरत होते. बाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात नाईक मराठा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. बाबा आचरेकर यांच्या नावे "समाज महर्षी" पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. यंदाचे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी २०२३ साली हा पहिला पुरस्कार मुंबईतील राजहंस प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष सुहास कबरे यांना आरोग्य क्षेत्रात करीत असलेल्या निस्वार्थी सेवेचा व उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार देण्यात आला होता.
नाईक मराठा मंडळाच्या पाच सदस्यीय निवड समितीने २०२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक,सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वर्गीय शशिकांत उर्फ दादा अणावकर यांची मरणोत्तर पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार सोहळा रविवार दि.२४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वा. कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित केलेला आहे.