
सावंतवाडी : एस.टी महामंडळाच्य बस सेवेमध्ये अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबतची नेमकी कारण कोणती व याची जबाबदारी कोण स्वीकारणार असा सवाल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे.
सुरक्षित प्रवास व मध्यमवर्गीयांना परवडणारी सेवा म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिले जाते. परंतु आज जीव मुठीत धरून एसटी महामंडळाच्या बसने प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. दर आठ दिवसांनी एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झालेल्याची बातमी सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळते. काही एस.टी बसची अगदी वाईट दुर्दशा झालेली दिसते आणि अशा बसने प्रवाशांना नेहमी प्रवास करावा लागतो ही एक मोठी शोकांकित आहे. खास करून महिलां प्रवाशांची संख्या वाढत चाललेली दिसते तर ज्येष्ठ नागरिक सुद्धा या एस.टी बसने प्रवास करतात. वाढत्या प्रवाशांच्या व आपल्या ग्राहकांच्या जीवाची काळजी घेणे हे एस.टी व्यवस्थापकांचे मुख्य काम आहे. म्हणूनच जबाबदारीने या गोष्टीचा विचार करून वाढत चाललेले एसटी बसचे अपघात कमी करण्यासाठी वेळेत लक्ष घालून या त्रुटी लवकरात लवकर दूर करून प्रवाशांच्या जीवास धोका होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केली आहे.