तेलंगणाच्या वृद्धेचे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने वाचवले प्राण !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 10, 2024 11:53 AM
views 95  views

सावंतवाडी : तेलंगणा राज्यातील नागपल्ली येथील वृद्धेच्या बायपास सर्जरीसाठी दुर्मिळ अशा ओ निगेटीव्ह रक्ताच्या फ्रेश ६ बँगांची गरज होती. यावेळी वृद्धेच्या नातीच्या मैत्रिणीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधला.  यावेळी प्रकाश तेंडोलकर यांनी तात्काळ नियोजन करीत दुर्मिळ रक्तगटाच्या सहा पिशव्या उपलब्ध करीत वृद्धेचे प्राण वाचविले. त्यामुळे पवित्र अशा रक्तदान चळवळीला धर्म, जात आणि सिमा यांच्या मर्यादा नसतात हे रक्तदान चळवळीत महत्त्वाचे योगदान देत असलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने पुन्हा एकदा सिद्ध केले.

        

तेलंगणा राज्यातील नागपल्ली येथील श्रीम मारेड्डी रावण्णाम्मा (वय ७०) ही वृद्धा तात्काळ बायपास सर्जरीसाठी तेथीलच केअर हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या सर्जरीसाठी दुर्मिळ अशा ओ निगेटीव्ह रक्ताच्या फ्रेश ६ बँगांची गरज होती. मात्र या दुर्मिळ रक्तगटाचे दाते मिळत नसल्यामुळे ही वृद्धा बायपास सर्जरीच्या प्रतीक्षेत होती. याबाबत रविवारी सकाळी या वृद्धेच्या नातीच्या वैभववाडी येथील मराठा फार्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या साक्षी पाटील या मैत्रिणीशी संपर्क साधला. त्यानंतर साक्षी पाटील हिने रक्तदान चळवळीबाबत या कॉलेजमध्ये मार्गदर्शन केलेल्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्याशी संपर्क साधला आणि याची माहिती दिली.  त्यानंतर प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदान चळवळीत राष्ट्रीयस्तरावर काम करीत असलेल्या आपले सांगली - तासगाव येथील मित्र विक्रम यादव यांना तात्काळ संपर्क साधत या दुर्मिळ रक्तगटाच्या आवश्यकतेची माहिती दिली. त्यानंतर विक्रम यादव यांनी नेहमीप्रमाणे तात्काळ होकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी साक्षी पाटील आणि या वृद्धेच्या  नातेवाईकांशी संपर्क साधत याबाबतची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर योग्य नियोजन करीत अहमदनगर येथील एक आणि इतर दोन असे तीन या दुर्मिळ रक्तगटाचे रक्तदाते रक्तदानास तयार केले. तर उर्वरित या दुर्मिळ रक्तगटाच्या तेलंगणा येथील तीन दात्यांचे संपर्क नंबर साक्षी पाटील आणि या वृद्धेच्या नातेवाईकांना दिले.

        

त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील तीन रक्तदाते सोमवारी सकाळी तेलंगणा येथे पोहोचले असल्याची माहिती विक्रम जाधव यांनी प्रकाश तेंडोलकर यांना दिली. अशाप्रकारे  परराज्यातील दुर्मिळ रक्तगटाची ही आव्हानात्मक मागणी साक्षी पाटील आणि विक्रम जाधव यांच्या मदतीने सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानने पूर्ण केली. याबद्दल या वृद्धेच्या नातेवाईकांसह साक्षी पाटील यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांचे आभार मानले.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या मागर्दशनाखाली सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने यापूर्वी उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे, ठाणे, बेळगाव, मिरज आंध्रप्रदेश, रत्नागिरी कोल्हापूर, सातारा, सांगली, गोवा अशा अनेक ठिकाणच्या रुग्णांना आपल्या महाराष्ट्र राज्य भरातील  रक्तमित्रांच्या सहाय्याने तात्काळ रक्त उपलब्ध करून देऊन त्यांचे प्राण वाचवले आहे. तसेच गेल्या ४ वर्षांत आतापर्यंत २५० पेक्षा जास्त रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्तदान चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सुमारे ८०० पेक्षा अधिक ऑन कॉल रक्तदाते उपलब्ध करून दिले आहेत. प्रतिष्ठानने १४ थॅलेसेमियाग्रस्त बालके दत्तक घेतली असून त्यांना रक्ताची थोडीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाते.