गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चिपळूण हादरलं

तरुणाचा खून, काही तासात छडा लावण्यात पोलिसांना यश
Edited by: मनोज पवार
Published on: September 08, 2024 08:09 AM
views 1214  views

चिपळूण : चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसरात, एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात, आज रविवार, ता. ८ सप्टेंबर रोजी सकाळी आढळला आहे. तरुणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आल्याने, चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे नाव हमीद शेख असल्याची  माहिती मिळाली आहे. 

तर चिपळूण बहादूर शेख नाका येथील या हादरवून टाकणाऱ्या खुनाचा छडा अवघ्या काही तासात लावण्यात चिपळूण पोलिसांना यश आलं आहे. खून करणाऱ्या दोन तरुणांना चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघे संशयित आरोपी चिपळूण येथील वडार कॉलनी परिसरात राहणारे आहेत.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, हमीद शेख हा, लोकांकडे दहावीस रुपये मागून,  आलेल्या पैशातून दारू पिऊन, परिसरात रस्त्यावर शिव्या देत फिरत असायचा.

काल, शनिवार, ता.७ सप्टेंबर रोजी रात्री, तो नेहमीप्रमाणेच, दारु पिऊन रस्त्यावर  शिव्या देत होता. त्याचवेळी वडार कॉलनीतील रहिवाशी असलेले आरोपी निलेश आनंद जाधव, आणि त्याचा साथीदार ( अल्पवयीन) त्या रस्त्याने जाताना , त्यांना वाटले की आपल्यालाच शिव्या देतो आहे. त्यातून त्यांचे , हमीद शेख सोबत भांडण झाले.  याभांडणातच निलेश जाधव याने हमीद शेखच्या डोक्यात फरशी घातली आणि त्यांच्या साथीदाराने दगडाने घातल्याने हमीदचा जीव गेला, अशी माहिती मिळाली आहे. अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहेत.