
वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील सुमारे २१५ भजन मंडळ यांना भजन साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरती संग्रह व वेंगुर्ला तालुका विकास अहवाल याचेही वाटप करण्यात आले.
सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातुन अर्ज सादर केलेल्या सुमारे ७५० भजन मंडळांना मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे भजन साहित्य वाटप करण्यात आले. यात वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी २१५ भजन मंडळांना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते हा भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. या भजन साहित्यामध्ये तबला किंवा मृदुंग, टाळ किंवा झांज असे साहित्य वाटण्यात आले. यावेळी बोलताना नितीन मांजरेकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून दीपक केसरकर शिधा व भजन साहित्य वाटप करत आहेत. या मतदार संघातील प्रत्येक कुटुंब सुखी समाधानी व्हावे अशी त्यांची नेहमीच इच्छा आहे. प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी ते नेहमीच विविध योजना या जिल्ह्यात राबवत आहेत. यामुळे आगामी काळात जनता मंत्री केसरकर यांच्या पाठीशी ठाम राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.