
दोडामार्ग : येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली. महाराष्ट्रात सर्वत्र हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. पण कोकणातील गणेशोत्सवाची बातच निराळी! कोकणवासीयांची गणेशोत्सवाची लगबग, बाप्पाच्या आगमनाचीआतुरता या सर्व गोष्टी अवर्णनीय आहेत.
कोकणात घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. हीच संकल्पना घेऊन महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने एक दिवशीय गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते गणेशाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरत्या, भजने,फुगड्या असे विविध कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी मोदक स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यास्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले व वेगवेगळ्या प्रकारची मोदक पाककृती सादर केली . यामध्ये रुचिरा नाईक हिने प्रथम, तर तारा घोगळे व वैष्णवी गवस यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परिक्षण डॉ. सोपान जाधव व योगेश ठाकूर यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख प्रा. रोहन बागकर व प्रा. दर्शनी कोटकर, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.