
देवगड : सहकारी बँकींगची ८८ वर्षांची यशस्वी परंपरा जोपासणाऱ्या येथील दि देवगड अर्बन को-ऑप. बँक लि., देवगडचा एकत्रित व्यवसाय सन २०२३-२०२४ अखेर रू. ८३ कोटी१० लाख एवढा झाला असून या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या व्यवसायामध्ये रू. ६ कोटी २६लाख अशी उल्लेखनीय वाढ झाली आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सदाशिव पु. ओगले यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीमध्ये केले.
समाजातील कष्टकरी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी देवगड अर्बन बँकेची उपयोगिता अधिक सक्षम ठरावी या हेतूने संचालक मंडळ प्रयत्नशील असून बँकेच्या विविध स्वरूपाच्या आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा सभासद खातेदारांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. ओगले
यांनी केले आहे. बँकेकडे ठेव योजनांवर सेवानिवृत्त खातेदारांसाठी १ टक्का जादा व्याज दिले जात आहे.तसेच मा. महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., महाराष्ट्र संशोधन,उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ यांचेमार्फत उपलब्ध व्याज परतावा योजनांमध्ये बँकेने सहभाग घेतला असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या बँकेच्या खातेदारांना याचा विशेष लाभ होत आहे.
बँकींग क्षेत्रासाठी आवश्यक मानकांची पूर्तता आणि बँकेची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी संचालक मंडळ कटीबध्द असून बँकेच्या खातेदारांकडून मिळणाऱ्या आपुलकी आणि पाठींब्याबद्दल ऋणी असल्याचे सदाशिव पु. ओगले यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास ह. फराकटे आणि बँकेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ उद्योगपती नंदकुमार घाटे आणि माजी आमदार अॅड. अजितराव गोगटे उपस्थित होते.